नवीदिल्ली (वृत्तसंस्था) पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधकांच्या या माकडचेष्टांना १३० कोटी जनता कधी विसरणारही नाही आणि त्यांना माफही करणार नाही, अशा शब्दात पंतप्रधानांनी पित्रोदा यांच्यावर टीकास्त्र सोडले.
‘विरोधक आमच्या लष्कराची सतत बदनामी करत आहेत. विरोधकांकडून होत असलेल्या वक्तव्यांबाबत भारतीय नागरिकांनी त्यांना जाब विचारायला हवा’, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. भारतीय नागरिकांचा आमच्या लष्करावर पूर्ण विश्वास असल्याचेही पंतप्रधान ट्विटद्वारे म्हणाले आहेत.
भारतीय हवाई दलाने ३०० लोकांना मारले असेल तर ठीक आहे, असे म्हणत मात्र, याचे पुरावे दिले जातील का ?, असा सवाल पित्रोदा यांनी उपस्थित केला आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात किती दहशतवाद्यांना मारले आणि त्याने काय परिणाम झाला हे जाणून घेण्याचा भारतीय नागरिकांना हक्क नक्कीच आहे, असेही पित्रोदा म्हणाले होते. यावर पंतप्रधान मोदी यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे.