भाजपने काढला पीडी. . . आता कधी येणार सीडी ?

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | राज्याच्या राजकारणात सीडी निघणार, निघणार म्हणून चर्चा सुरू असतांना मध्येच ईडीचे वारे आले. यातून त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ अशा गर्जना झाल्या. नंतर सीडी प्रकरण थंड बस्त्यात गेले असतांना आज भारतीय जनता पक्षाने ‘पीडी’ अर्थात ‘पेन ड्राईव्ह’ जगासमोर आणून दणका दिला. यामुळे आता सीडी येणार की नाही ? याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी अनेकदा जाहीररित्या कथित सीडीबाबत भाष्य केल्याने राज्याच्या राजकारणात याबाबत कधी काळी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांनी ही सीडी नेमकी कुणाची आहे ? याबाबत जाहीरपणे आरोप केले नसले तरी याचा सरळ अंगुलीनिर्देश हा त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आमदार गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचे कुणापासून लपून राहिले नाही. त्यांनी अनेकदा ‘सीडी-सीडी’ केले तरी कधी सीडी बाहेर काढलीच नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतांना नाथाभाऊंनी ‘त्यांनी ईडी लावली तर आपण सीडी लाऊ’ असे वक्तव्य करून धमाल उडवून दिली होती. अर्थात, यानंतर काही महिन्यातच नाथाभाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला तरी सुध्दा कधी सीडी लागली नाही. मध्यंतरी नाथाभाऊंनी एकदा संबंधीत ‘सीडी’ ही नेत्याची नसून त्याच्या पीएची असल्याचे वक्तव्य केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य कमी झाले. तर, नंतर नाथाभाऊंनी याबाबत बोलणेच टाळल्याने आज सीडीचा विषय हा एक विनोदी किस्सा म्हणून सोशल मीडियातून फिरण्याइतका उरलेला आहे.

एकीकडे ‘ईडी विरूध्द सीडी’ हा विषय हास्यास्पद बनला असतांना आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभे ‘पीडी’ म्हणजेच पेनड्राईव्ह दाखवून खळबळ उडवून दिली. याचे वैशिष्ट्य म्हणजे या पीडीमध्ये आमदार गिरीश महाजन यांना ‘मोक्का’मध्ये अडकवण्यासाठी कट रचण्यात आल्याचे पुरावे व्हिडीओ आणि ऑडिओच्या स्वरूपात देण्यात आले. यातील बराचसा संदर्भ हा गिरीश महाजन यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कट-कारस्थानांना दर्शविणारा असल्याचा दावा फडणवीस यांनी केला असून साहजीकच याच नाथाभाऊंचा उल्लेख देखील अनेक ठिकाणी आलेला आहे.

सीडीच्या उल्लेखानंतर ईडी सुध्दा सक्रीय झाली आणि आता पीडी सुध्दा निघाला असतांना आता याचा नाथाभाऊ आणि एकंदरीत त्यांच्या पक्षाकडून ‘काऊंटर अटॅक’ म्हणजेच पलटवार हा कशा स्वरूपात होईल ? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. ‘सीडी विरूध्द ईडी विरूध्द पीडी’ असा वाद रंगला असतांना फडणवीस यांनी बॉंब टाकला आहे. यामुळे या प्रकरणात आता यापुढे नेमके काय होणार याची उत्सुकता लागलीच आहे.

Protected Content