मुंबई, वृत्तसंस्था | शरद पवार यांनी एल्गार परिषदेप्रकरणी केलेल्या वक्तव्याचे आश्चर्य वाटले, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्यांना अटक झाली त्यांची पार्श्वभूमी काय आहे ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना सुधीर ढवळे, अरुण परेरा यांना अटक करण्यात आली होती. तर मनमोहन सिंग सरकारने या बंदी घातलेल्या संघटनांची नावे संसदेत सांगितली होती. तेव्हा ते योग्य होते, मग आमच्या सरकारच्या काळात कारवाई झाल्यास लगेचच जातीयवादी कसे ? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. शरद पवार यांनी एल्गार परिषदेतील ज्या व्यक्तींना अटक करण्यात आली, त्याबाबत आणि पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत नुकतेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की “सर्वोच्च न्यायालयाने देखील या व्यक्तींना जामीन नाकारला. फक्त कोरेगाव भीमाच नव्हे, तर अन्य अनेक प्रकरणात देखील अटक आरोपींचा हात असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे सोयीची भूमिका शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याने घेणे योग्य नाही, अशा भूमिकेमुळे पोलिसांचा आत्मविश्वास कमी होईल,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर शरद पवारांचा पक्ष सत्तेत असतानाच यादीत अर्बन नक्षल हा शब्द आला असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
नागपूर येथील अधिवेशनाबाबत विचारले असता ते म्हणाले की, नव्या सरकारचे पाहिले अधिवेशन, त्यात लक्षवेधी, नवे मंत्री, खातेवाटप, प्रश्नांची उत्तरे असे काहीच नसल्याने अधिवेशनाची केवळ औपचारिकता पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, या नव्या सरकारमधील मंत्रीमंडळ विस्ताराला एवढा वेळ का लागतोय, ते कळत नाही. असे सांगत महाविकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला.
हे सरकार किती काळ टिकेल या प्रश्नावर ते म्हणाले की, मी भविष्यकार नाही, पण अशा प्रकारचे सरकार कधीच कोणत्या राज्यात चाललेले नाहीत. हे सरकारही त्याला अपवाद ठरणार नाही. शेतकर्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यातील शेतकर्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत केली जाईल अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र एक नव्या पैशाची मदत, या सरकारने केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासघात करण्यास, या अधिवेशनामधून सुरुवात झाली असल्याचे सांगत शिवसेनेवर टीका केली.
सीएए आणि एनआरसीचे पडसाद राज्यात देखील उमटत आहे. त्यावर ते म्हणाले की, देशात सीएए आणि एनआरसी हा वाद १०० टक्के राजकीय हेतूने प्रेरित केलेला असून अल्पसंख्यकांची माथी भडकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामुळे कोणाचीही नागरिकता काढून घेतली जाणार नाही, तर दिली जाणार आहे. आपल्या देशातील अल्पसंख्यकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
अमृता राजकारणात येणार नाही :- अमृता फडणवीस या अनेक वेळा राजकीय भूमिका मांडतात तर त्या राजकारणात येणार का त्या प्रश्नावर म्हणाले की, अमृता फडणवीस वेगळे व्यक्तिमत्व असून त्यांचे निर्णय त्या स्वतः घेतात. त्या कधीही राजकारणात येणार नाहीत. पण अनेकदा अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, ते देखील त्यांना भोगावेच लागते. अशी भूमिका त्यांनी मांडली.
पाच वर्षात मुलीला कुठेच नेले नाही :- मागील पाच वर्षात काय कमावले आणि काय गमावले या प्रश्नावर ते म्हणाले की, लोकांचे प्रचंड प्रेम आणि विश्वास पाच वर्षात मिळवला. पण वैयक्तिक जीवनात अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या आहेत. गेल्या पाच वर्षात एकही दिवस सुटी घेतली नाही, मुलीला हॉटेल, सिनेमा आणि गार्डन मध्ये घेऊन गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले.