पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे 23 जानेवारी रोजी होणाऱ्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि पारितोषिक वितरण समारंभाला शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी व्हीएसआयतर्फे 2023-24 च्या गळीत हंगामातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्याला देण्यात येणार आहे. हा कारखाना अजित पवारांशी संबंधित मानला जातो. कारखान्याचे सीईओ जंगल वाघ आणि संचालक अजय कांगलकर व दिलीप भोसले हे अजित पवारांचे विश्वासू सहकारी आहेत.
कार्यक्रमात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जालना जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याला, तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील न्याचरल शुगर्स अँड अलाइड इंडस्ट्रीजला प्रदान केला जाणार आहे.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार, संस्थेतील शास्त्रज्ञ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कारदेखील वितरित केला जाणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित सहभाग आणि या कार्यक्रमाचे महत्त्व पाहता, साखर उद्योग तसेच राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.