दिल्लीत पवार आणि मोदींची भेट

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच, दिल्लीत एकीकडे राजकीय हालचालींना सुरुवात झाल्याचे पहायला मिळत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, एकीकडे राज्य सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याने सतत केंद्रातील भाजपा सरकारविरोधात वक्तव्यं करत जाहीर निषेध करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये भेट झाली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधान कार्यालयात जवळपास २० मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात याआधीही भेटी झाल्या आहेत. देशाच्या राजकारणातील मोठे नेते असणाऱ्या शरद पवार आणि मोदींमध्ये भेट झाल्यानंतर त्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र यावेळी शरद पवारांनी घेतलेली भेट आणि महाराष्ट्रातील घडामोडी यामुळे याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात ईडीकडून सत्ताधारी नेत्यांवर कारवाई सुरु असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत तर दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेलं यश पाहता या निवडणुकीचं महत्व वाढलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२.३० च्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीत फक्त दोन्ही नेते उपस्थित असल्याचं समजत आहे. पण यावेळी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण यावेळी राजकीय चर्चाही झाल्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Protected Content