नागपूर प्रतिनिधी । तालुक्यासह विदर्भातही पावसाने दांडी मारल्यामुळे धान उत्पादक शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे. यंदा १८ जून ते २३ जुलैदरम्यान फक्त २४१ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाअभावी अनेक शेतक-यांचे धानाची पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहे.
याच अवधीत गेल्या 4 वर्षांत सदर आकडेवारीच्या दुप्पटीने पाऊस पडल्याची नोंद आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांचे धानाची काही पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहे. तर उर्वरित कसेबसे जगविण्याचा आटापिटा सुरू असल्याचेच चित्र आहे. पेरणी केली तरी हाती पीक येईपर्यंत धान पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. अडचणीच्या वेळी पिकाला जीवदान देणारे पाणी पेंच प्रकल्पातून मिळेल काय? अशा एक ना अनेक विचारांनी शेतकरी प्रचंड तणावात आला आहे. पेंच प्रकल्पातील पाण्याच्या आशेवर तालुक्यात एकूण ३४ हजार ९४२ हेक्टर आर क्षेत्रापैकी सर्वाधिक म्हणजे २९ हजार २१३ हेक्टर क्षेत्रात धान पिकासाठी बांध्या तयार करण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्प पिण्याचेही पाणी देऊ शकत नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाची दांडी, पावसाने उशिरा हजेरी लावणे, हे नवीन नाही.