जळगाव, प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेमार्फत 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित संविधान साक्षर ग्राम अभियानाचा पातरखेडा, तालुका एरंडोल येथून शुभारंभ झाला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेलल्या डॉ. बाबासाहेब आंबेडर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे या संस्थेचे महासंचालक कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचलिका प्रज्ञा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात 36 जिल्ह्यात संविधान साक्षर ग्राम अभियान सुरू आहे.
सदर अभियानांतर्गत पातरखेडा, तालुका एरंडोल येथे संविधान दिनी 26 नोव्हेंबर रोजी संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचे उद्घाटनानंतर गावात नागरिकांना संविधानाचे महत्व आणि ओळख व्हावी. या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरी नंतर प्रमुख वक्त्यांनी संविधानाविषयी आपले विचार मांडून संविधानाचे महत्व उपस्थित नागरिकांना सांगितले. संविधान प्रचार, प्रसार आणि प्रभातफेरी प्रसंगी एरंडोलच्या गट विकास अधिकारी श्रीमती गायकवाड, पंचायत समितीतील विस्तार अधिकारी नाना बोरसे, डी.डी.एस.पी महाविद्यालय, एरंडोलचे मुख्याध्यापक प्रा.नरेंद्र गायकवाड,आश्रम शाळा पातरखेडाचे मुख्याध्यापक श्री.पवार, आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपथित होते.
प्रकल्प अधिकारी भागश्री पाईकराव, समतादूत महेंद्र मराठे, प्रभातफेरीचे आयोजक शांताराम हटकर, श्रीमती स्नेहा बोरसे यांनी संविधानाची ओळख आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचे महत्व पटवून दिले. श्रीमती पाईकराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तर आभार जयश्री गायकवाड व अर्जुन गायकवाड यांनी मानले. 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2019 या दरम्यान संविधान साक्षरतेचा कार्यक्रम यशस्वितेसाठी पातरखेडा येथील शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.