रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातून दररोज भुसावळ येथे शिक्षण, व्यवसाय व नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली भुसावळ-रावेर शटल बस सेवा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निर्धारित वेळेपूर्वीच बस सुटत असल्याने प्रवाशांना अपेक्षित दिलासा मिळत नसून याबाबत प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रावेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच व्यावसायिक व नोकरदार वर्ग भुसावळ व जळगाव येथे दररोज अपडाऊन करतो. मात्र संध्याकाळच्या वेळेत भुसावळ येथून रावेरकडे थेट बस नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. परिणामी अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन प्रवाशांनी आमदार अमोल जावळे यांच्याकडे भुसावळ येथून संध्याकाळी साडेपाच वाजता रावेरसाठी बस सुरू करण्याची मागणी केली होती.

या मागणीनुसार विभाग नियंत्रक श्री. बंजारा यांनी भुसावळ आगाराला भुसावळ-रावेर शटल बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आणि गेल्या पंधरा दिवसांपासून ही बस सेवा कार्यान्वित झाली. मात्र बसची अधिकृत सुटण्याची वेळ संध्याकाळी साडेपाच असताना चालक व वाहक ही बस 15 ते 20 मिनिटे आधीच रावेरकडे घेऊन जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे वेळेत स्थानकावर पोहोचणाऱ्या प्रवाशांना बस मिळत नसून सेवेचा मूळ उद्देशच फोल ठरत असल्याचे चित्र आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळच्या वेळेस कार्यालयीन व शैक्षणिक कामे आटोपून अनेकजण साडेपाचपर्यंत बस स्थानकावर पोहोचतात. मात्र बस आधीच निघून गेल्याने पुन्हा खासगी वाहनांचा वापर करण्याची वेळ येते. केवळ शटल बसच नव्हे तर भुसावळ बस स्थानकावरून रावेरकडे येणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या बसेसही निर्धारित वेळेपूर्वीच निघत असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत आहेत.
या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून चालक-वाहक आपल्या मर्जीनुसार बस सेवा चालवत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. विभाग नियंत्रक श्री. बंजारा तसेच भुसावळ आगार व्यवस्थापकांनी याची तातडीने दखल घेऊन निर्धारित वेळेपूर्वी बस नेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी लावून धरली आहे.
दरम्यान, आमदार अमोल जावळे यांनी या विषयाकडे लक्ष घालून एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, जेणेकरून रावेर तालुक्यातील अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



