Home Cities जळगाव फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या 80 वाणांचे थेट प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी पर्वणी

फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या 80 वाणांचे थेट प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी पर्वणी

0
136

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या संधी एकाच छताखाली आणणारा ‘फुले कृषी महोत्सव : 2026’ अंतर्गत विशेष ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम मंगळवार, 3 फेब्रुवारी 2026 रोजी केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे आयोजित करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट पीक प्रात्यक्षिके आणि आधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरात लागवडीखाली असलेल्या तब्बल 80 केळी वाणांची प्रायोगिक लागवड एकाच ठिकाणी पाहण्याची दुर्मिळ संधी. फुले प्राइड, अर्धापुरी, वसई, श्रीमंती, ग्रँड नैन, विल्यम्स, बसराई, राजापुरी यांसारख्या प्रगत वाणांची प्रत्यक्ष शेतातील प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरले. विविध वाणांतील उत्पादन क्षमता, गुणवत्तेतील फरक आणि बाजाराभिमुख निवडीबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळाली.

कार्यक्रमात केळी स्थूल अभिवृद्धी प्रात्यक्षिकांसह लागवड पद्धती, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, ठिबक सिंचन व फर्टिगेशन तंत्रज्ञानावर तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात आले. पानांवरील रोग, मुळकुज, सूत्रकृमी यांचे निदान तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतींबाबत सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले गेले.

केळी बागेत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला असून मल्चिंग, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, जैविक खते, सेंद्रिय उपाय, निर्यातक्षम घडाचे व्यवस्थापन यांसह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तावाढ कशी साधता येईल, याबाबत शेतकऱ्यांना दिशा मिळणार आहे.

याशिवाय केळीपासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांवरही कार्यक्रमात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. केळी चिप्स, पावडर, पीठ, वेफर्स, केळी वाईन, जॅम आदींच्या निर्मिती तंत्रज्ञानासोबतच घरगुती व लघुउद्योग स्तरावरील प्रक्रिया, बाजारपेठेच्या संधी आणि उत्पन्न वाढीचे मार्ग शेतकऱ्यांसमोर मांडले जाणार आहेत.

शिवार फेरी, शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, अनुभवांची देवाणघेवाण तसेच केळी लागवड व काढणीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण व अवजारांची प्रात्यक्षिके हा कार्यक्रम अधिक उपयुक्त बनवणार आहेत. संशोधन निष्कर्ष प्रत्यक्ष शेतात पाहण्याची आणि भविष्यातील संधी समजून घेण्याची ही संधी केळी उत्पादकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

केळी शेतीतील नव्या संधी, संशोधनाधारित तंत्रज्ञान आणि उत्पन्नवाढीचे मार्ग जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, जळगाव केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले तसेच शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. संदीप पाटील व उपाध्यक्ष श्री. विनोद बोरसे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound