पक्षांचे खातेवाटप झाले, अंतर्गत वाटपामुळे उशीर – राऊत

sanjay raut

मुंबई, वृत्तसंस्था | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपाचा निर्णयही लांबत चालला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तीन दिवस लोटले तरी खातेवाटप करण्यात आलेली नाही. खातेवाटपावरून महाविकास आघाडीत कुरबूरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. राऊत म्हणाले, “खातेवाटपावरून महाविकास आघाडीत कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप झालेले आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही. आज (२ जानेवारी) सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” अशी माहिती राऊत यांनी दिली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिनाभरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर खातेवाटपसंदर्भातही विलंब होत असल्याने महाविकास आघाडीत खातेवाटपावरून कुरबुरी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये संवाद राहावा. अनेक मुद्यांवर चर्चा व्हावी, म्हणून शरद पवार यांनी सुकाणू समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. या समितीतील तिन्ही पक्षाचे नेते भेटत असतात. खातेवाटपावरून कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये आधीच खातेवाटप झालेले आहे. पक्षातंर्गत खातेवाटपाचा प्रश्न शिल्लक होता. तोही जवळपास सुटला असून, संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” असे राऊत म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झालेल्या भास्कर जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. त्यावरून भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असे मत व्यक्त केले होते. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, “सरकार स्थापन करताना घटक पक्षांना वाटा द्यावा लागणार होता. तो शिवसेनेने दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने दिला नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू, शंकरराव गडाख, यड्रावरकर यांना शब्द दिला होता. आता माध्यमांतून नाराजीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. प्रत्यक्षात तसे काही घडलेले नाही. उद्धव ठाकरे यांना मी ओळखतो. त्यांनी शब्द दिला असेल तर तो शब्द ते पाळतात. भास्कर जाधव म्हणत आहेत, उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला आणि पाळला नाही, यावर माझा विश्वास नाही. सत्तेचे वाटप उद्धव ठाकरे योग्य पद्धतीने करत आहे,” असेही राऊत म्हणाले.

Protected Content