गळ्याला चाकू लावून ट्रक चालकाला लुटणाऱ्या पॅरोलवरील गुन्हेगाराला अटक

अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज | गलवाडे रस्त्यावर ट्रक अडवून ट्रक चालकाच्या गळ्याला चाकू लावून एक हजार रुपये हिसकावून, मालकाकडून एक लाख रुपयांची मागणी करत खून करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना २७ एप्रिल रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पॅरोलवर सुटलेला गुन्हेगार कैलास नवघरे याला अटक केली आहे.

अनिल अश्रूबा विलग (रा. कोनोसी ता. शिवगाव, जि. अहिल्यानगर) हा चालक स्वप्नील झिने यांचा मालकी हायवा ट्रक (क्रमांक MH-16-CE-4797) चालवत होता. भुसावळ येथून फ्लॅश पावडर घेऊन नरडाणा येथे जात असताना गलवाडे रस्त्यावर मोटरसायकलवर आलेल्या तीन जणांनी ट्रक आडवला. त्यापैकी एकाने स्वतःची ओळख “कैलास नवघरे – अमळनेरचा डॉन” म्हणून करून दिली. त्याने ट्रकच्या केबिनमध्ये चढून चालकाच्या गळ्याला चाकू लावला आणि एक लाख रुपये मागितले.

चालकाच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून घेण्यात आले. दुसऱ्या व्यक्तीने आपले नाव मोझम शेख असल्याचे सांगितले. या टोळीने ट्रक मालकाला फोन करून एक लाख रुपये न दिल्यास खून करण्याची धमकी दिली. चालकानेही मालकाला फोन करून पैसे मागण्याची विनंती केली. ट्रक बाजूच्या कॉलनीत घेऊन जाण्याचा प्रयत्नही झाला.

दरम्यान, चालकाच्या सूचनेवरून मालकाने तात्काळ अमळनेर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र कोठवदे, संतोष पवार, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, सुनील पाटील, योगेश बागुल आणि संजय सोनवणे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच मोझम शेख व तिसरा अनोळखी आरोपी पळून गेला. मात्र, कैलास नवघरे याला तात्काळ अटक करण्यात आली.

कैलास नवघरे हा यापूर्वी खून प्रकरणात शिक्षा भोगत असून तो सध्या पॅरोलवर बाहेर आला होता. २७ एप्रिल रोजी त्याला पुन्हा तुरुंगात परत जायचे होते, मात्र त्याआधीच या गुन्ह्यात तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणी तिघांविरुद्ध जबरी चोरी आणि रस्ता अडवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

Protected Content