पीएम किसान योजनेत घोळ : सहा दलालांच्या विरूध्द गुन्हा

पारोळा प्रतिनिधी | पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बोगस कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळवून देणार्‍या सहा दलालांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षात शेतकर्‍यांना ६ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य तीन हप्त्यात थेट खात्यात प्राप्त होतात. ही योजना अतिशय पारदर्शक असल्याने शेतकर्‍यांना याचा लाभ होत असतो. तथापि, यात १८ जणांच्या नावावर जमीन नसतांनाही त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

या संदर्भात केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये तहसीलदारांचे अनधिकृतपणे लॉगीन आयडी, पासवर्ड वापरून बेकायदेशीरपणे या योजनेचा लाभ दलालांनी संबंधित लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन मिळवून दिल्याचे दिसून आले. यामुळे शासनाची फसवणूक झाली आहे. या अनुषंगाने तहसील कार्यालयाचे कर्मचारी नइमोद्दीन नसिरोद्दीन मुजावर यांच्या फिर्यादीवरून राहुल जगन्नाथ पाटील (चोरवड), प्रशांत उत्तम हटकर (कमतवाडी), महेश ज्ञानेश्वर खैरनार (मंगरूळ), देविदास जगन्नाथ जाधव (मंगरूळ), संजय धर्मा बाविस्कर (मोंढाळे प्र.उ), सचिन विठ्ठल पाटील उर्फ बाबाजी (शिरसमणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सहाही जणांनी बनावट लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी दलाल म्हणून काम केल्याची माहिती समोर आली असून चौकशीत यातील अजून सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Protected Content