बाजार समितीच्या संचालक मंडळास पुन्हा सहा महिने मुदतवाढ

पारोळा प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाला शासनाने पुन्हा एकदा सहा महिने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला वाढीव कालावधी मिळाला आहे.

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती वर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षा पासून अमोल चिमणराव पाटील हे सभापती पदावर कार्यरत आहेत. या संचालक मंडळाची १८ सप्टेंबर २०२० रोजी मुदत संपली होती. परंतु राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता, सहकार पणन विभाग वतीने शासनाला बाजार समिती संचालक मंडळ मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावरून शासनाने १८ मार्च २०२१ पर्यंत ६ महिन्याची मुदतवाढ ही बाजार समितीला दिली होती.

ही मुदतवाढ आता संपण्याच्या मार्गावर आहे. तथापि, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे काही संस्था च्या निवडणुका या ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलून देण्यात आले आहे. ही तांत्रिक अडचण पाहता पारोळा बाजार समिती संचालक मंडळ निवडणुका घेणे शक्य नसल्याने सहकार पणन विभागाने शासनाकडे पुन्हा संचालक मंडळ मुदतवाढ चा प्रस्ताव सादर केला होता. त्याअनुषंगाने शासनाने पारोळा बाजार समिती संचालक मंडळाला १८ सप्टेंबर २०२१ पर्यत ६ महिने मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीचे सत्ताधार्‍यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Protected Content