पारोळा पं.स.सभापतीपदी रेखा भील तर उपसभापतीपदी अशोक पाटील बिनविरोध

parola news

पारोळा प्रतिनिधी । पंचायत समिती सभापती उपसभापतीसाठी आज निवड घेण्यात आली. त्यात सभापतीपदी शिवसेनेच्या रेखाबाई देविदास भिल तर उपसभापतीपदी अशोक नगराज पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंद व्यक्त केला.

पं.स.सभापती पदासाठी अनुसूचित जमाती हे आरक्षण निघाले होते. त्या अनुषंगाने देवगाव गणाच्या सदस्य रेखाबाई देविदास भिल या एकमेव अनुसूचित जमाती संवर्गातून निवडून आलेल्या सदस्य आहेत. त्यामुळे आरक्षण सोडतच्या दिवशीच त्यांची सभापती निवड निश्चित झाले होते. तर उपसभापतीपदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागते. याकडे तालुक्याच्या राजकीय गटाचे लक्ष लागून होते. आज दुपारी 3 वाजता तहसीलदार तथा पिठासन अधिकारी अनिल गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या मुदतीत सभापतीपदासाठी रेखाबाई देविदास भिल तर उपसभापती पदासाठी अशोक पाटील या दोघांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने पीठासन अधिकारी श्री. गवांदे यांनी बैठकीत या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. बैठकीला सदस्य रेखाबाई भिल्ल, अशोक पाटील, छायाबाई जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद जाधव, सुनंदा पाटील हे सहा सदस्य उपस्थित होते. तर छायाबाई राजेंद्र पाटील, सुजाता बाळासाहेब पवार हे दोन्ही सदस्य गैरहजर होते.

आमदारांच्या हस्ते सत्कार
सभापतीपदी शिवसेनेच्या रेखाबाई भिल तर उपसभापतीपदी अशोक पाटील या दोघांची बिनविरोध निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ चिमणराव पाटील यांनी शिवसेना पक्ष कार्यालयात या दोघांचा सत्कार केला. यावेळी बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, उपसभापती मधुकर पाटील, चतुर पाटील. जिजाबराव पाटील. विजय सुदाम पाटील, प्रा आर बी पाटील, प्रेमानंद पाटील, सखाराम चौधरी, उंदीरखेड्याचे उपसरपंच गणेश पाटील, संचालक गणेश सिताराम पाटील, पांडुरंग पाटील, गोविंद पाटील, राजेंद्र पाटील पंचायत समितीचे सदस्य व इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने होते.

मजुर महिलेला मिळाला सभापती पदाचा मान
पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेच्या रेखाबाई भिल या विराजमान झाल्या आहेत. तालुक्यात पहिल्यांदा एका शेत मजूर महिलेला हा बहुमान प्राप्त झाला आहे. सभापती भिल यांचे पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ते सुरवात पासून शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. ते आजही उंदीरखेडे गावातील एकलव्य नगरात घरकूल मध्ये राहतात. गरीब महिलेला हा मान मिळाल्याने गावात आंनद व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content