दुर्दैवाचा फेरा : रावेरात एकाच महिलेच्या घरावर दंगलीत दुसर्‍यांदा हल्ला

रावेर शालीक महाजन । येथील शोभाबाई महाजन या विधवा महिलेच्या घरावर डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या दंगलीत हल्ला झाल्यानंतर कालच्या दंगलीतही पुन्हा हल्ला करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

रावेरच्या सामाजिक एकतेला सुरूंग लावणार्‍या घटना वाढीस लागल्या आहे. अलीकडच्या काळाचा आढावा घेतला असता शहरात २४ डिसेंबर रोजी भयंकर दंगल झाली होती. यानंतर कालच्या घटनेने पुन्हा एकदा या वेदना ताज्या झाल्या आहेत. यातील एक भयंकर योगायोग आज समोर आला आहे. २४ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या दंगलीत रावेर येथील संभाजी चौकात राहणार्‍या शोभाबाई महाजन या विधवेच्या घरावर हल्ला करून प्रचंड नासधुस करण्यात आली होती. यातून त्या कशा तरी सावरल्या होत्या. ही दुर्दैवी घटना विसरून त्या नव्याने आयुष्य जगत होत्या. मात्र रविवारी रात्री झालेल्या दंगलीत दंगेखोरांनी पुन्हा एकदा त्यांच्याच घराला लक्ष्य केले. यात पुन्हा त्यांच्या घरातील वस्तूंची प्रचंड नासधुस करण्यात आली आहे. यामुळे त्यांचा संसार पुन्हा एकदा वार्‍यावर आल्याचे दिसून येत आहे. त्यांचा संसार पुन्हा एकदा विस्कटला आहे. आज पोलिसांना याबाबतची माहिती देतांना शोभाबाई महाजन यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याने वातावरण भावूक झाले होते.

शोभाबाई महाजन यांचा संसार आता उघड्यावर पडला असल्याने आता त्यांना शासकीय पातळीवर अथवा वैयक्तीक वा सामाजिक पातळीवरून मदत मिळेल का ? हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

Protected Content