पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात अनेक दिवसांपासून डोकेदुखी ठरलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर अखेर पारोळा नगरपरिषदेने धडक कारवाई करत विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणे मोकळी झाली असून नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील, उपनगराध्यक्ष अॅड. रोहन मोरे तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशान्वये ही मोहीम राबवण्यात आली.
शहरातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि व्यापारी परिसरातील गर्दी वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने विशेष मोहीम आखून शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली. मोहिमेची सुरुवात शिवतीर्थ परिसरातून करण्यात आली आणि त्यानंतर डॉ. मोहरीर शॉपिंग कॉम्प्लेक्स, मासळी बाजार, मुख्य बाजारपेठ, भाजीपाला मार्केट, तलाव गल्ली, पिर दरवाजा आणि संविधान चौक या प्रमुख भागांतील अतिक्रमण हटवण्यात आले.

या कारवाईदरम्यान रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स, स्टॉल्स, फलक तसेच रस्त्यावर वाढवून ठेवलेली व्यापारी मांडणी हटवण्यात आली. नगरपरिषद प्रशासनाने संबंधितांना आधीच सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने अनेक ठिकाणी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे शहरात अनेक वर्षांपासून कायम असलेली अतिक्रमणांची समस्या कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
या मोहिमेत नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी श्रीमती यामिनी जटे, रचना सहाय्यक साक्षी मराठे, विशेष अतिक्रमण मोहिम प्रमुख अनिल तिदमे, स्थापत्य अभियंता सुमित पाटील, लेखापरीक्षक दीपक महाजन, अंतर्गत लेखापरीक्षक सार्थक मोरस्कर, पाणी पुरवठा अभियंता संकेत कार्ले, आरोग्य निरीक्षक दिलीप चौधरी तसेच नगरपरिषदेतील विविध विभागातील कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शहर तांत्रिक कक्षातील अधिकारी, समन्वयक आणि कर्मचाऱ्यांनीही मुख्य भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या कारवाईनंतर शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या उपक्रमाचे स्वागत केले. अनेक वर्षांपासून स्थिरावलेले अतिक्रमण काढणे शक्य नाही अशी धारणा काही अतिक्रमणधारकांमध्ये निर्माण झाली होती, मात्र या मोहिमेमुळे प्रशासनाचा निर्धार स्पष्ट झाला असून शहर स्वच्छ आणि मोकळे ठेवण्याच्या दृष्टीने सकारात्मक संदेश गेला आहे.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, ही कारवाई शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अद्याप अतिक्रमण असेल त्यांनी ते स्वयंस्फूर्तीने काढून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा पुढील काळात अशा कारवाया सुरूच राहतील.



