पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. सतीश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. यात सत्तेत असणार्या आमदार चिमणराव पाटील यांच्या पॅनलला महाविकास आघाडीने आव्हान दिले होते. यात त्यांचे पुत्र अमोल पाटील हे स्वत: मावळते सभापती असल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली होती.
या निवडणुकीत मविआच्या पॅनलने १८ पैकी १५ जागा पटकावत दणदणीत विजय संपादन केला होता. यानंतर सभापतीपदी कोण विराजमान होईल ? याची उत्सुकता लागली होती. या अनुषंगाने आज सभापतीपदी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील तर उपसभापतीपदी सुधाकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना-उबाठा जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.