परिस्थितीचे भान ठेवून शिक्षणाचे निकष बदलविले पाहिजे – डॉ.के.बी. पाटील

chopda news

चोपडा प्रतिनिधी । परीक्षा आणि परीक्षेतील मार्क्स इतकेच ते मर्यादित असू नये. बदलत्या काळात व्यवसाय आणि सेवांचे स्वरूप बदलले आहे. म्हणून शिक्षणही बदलले पाहिजे. जे विद्यार्थ्याला रुचेल, आवडेल, झेपेल तेच शिक्षण दिले गेले पाहिजे. असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील यांनी केले. सर्वांना परवडेल असे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणातून समाजात उत्तमपणे वागायला शिकवणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे शिकवले गेले पाहिजे. उत्तम व्यक्तिमत्व आणि उत्तम समाजजीवनाला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

चोपडा येथे भगिनी मंडळ संस्थेतर्फे १ डिसेंबर रोजी आयोजित ‘सुशील शिक्षक पुरस्कार’ वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक आशिष अरुणलाल गुजराथी, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, निवृत्त मुख्याध्यापक सुभाष पाटील, नपा गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक रमेश शिंदे, हुसेन पठाण, जितेंद्र देशमुख, जि.प. सदस्या डॉ. नीलम पाटील, अस्थिरोग तज्ञ डॉ. नरेंद्र शिरसाट, संचालिका संध्या गुजराथी, कल्पना पोतदार हे उपस्थित होते.

भगिनी मंडळ संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. डॉ. सुशीलाबेन शहा यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या या ‘सुशील शिक्षक पुरस्कार’ वितरणप्रसंगी पुढे बोलताना डॉ. के. बी. पाटील म्हणाले, शिक्षणाचा दर्जा घसरला म्हणून एकमेकांना दोष दिला जातोय. शिक्षकाचा समाजातला सन्मान कमी झाला आणि शिक्षणाचा दर्जा घसरला. परंतु केवळ हा एकच घटक याला जबाबदार नसून संपूर्ण व्यवस्थाच बिघडली आहे. एकेकाळी शिक्षणाची उज्वल परंपरा असलेल्या आपल्या देशात शिक्षणाचे महत्व कमी झाले आहे. राज्यकारभारात शिक्षणाचा प्राधान्यक्रम हा अतिशय मागे असून त्यावर फार कमी खर्च केला जात आहे. शिक्षणात काही विषय महत्त्वाचे तर काही कमी महत्त्वाचे मानणे ही चूक असून त्यामुळे शिक्षणाच्या दर्जा घसरतो. शिक्षकाची वर्तणूक, शिक्षण संस्थेतील वातावरण, समाजव्यवस्था यातून मुलं शिकत असतात. त्यासाठी बदल होणे आवश्यक आहे आणि हे बदल शिक्षकांनाच करावे लागतील, असे ठामपणे सांगून खाजगी संस्थांच्या तुलनेत शासकीय संस्था उत्तम शिक्षण देत आहेत, असेही त्यांनी सोदाहरण सांगितले.

भगिनी मंडळ या संस्थेने पारंपारिक अभ्यासक्रम सुरू न करता व्यावसायिक शिक्षणक्रम सुरू करत एक चांगला प्रयत्न केला आहे. तो भविष्यात कायम राहावा. ‘सुशील शिक्षक पुरस्कार’ हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. पुरस्कारार्थी शिक्षक जितेंद्र जोशी यांनीहीीी मनोगत व्यक्तत केले.

जितेंद्र जोशी यांना ‘सुशील शिक्षक पुरस्कार’
भगिनी मंडळ संस्थेच्या संचलित महिला मंडळ वोळूंतरी स्कूल मधील उपशिक्षक जितेंद्र नरेश जोशी यांना माजी कुलगुरू डॉ के बी पाटील यांच्या हस्ते पहिला ‘सुशील शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर प्रस्ताविक अध्यक्षा पुनम गुजराथी, मान्यवरांचा परिचय डॉ. विष्णू गुंजाळ यांनी तर आभार प्रदर्शन जितेंद्र जोशी यांनी केले. प्रारंभी महिला मंडळ माध्यमिक विद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते स्व. डॉ. सुशीलाबेन शाह यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमास शहर व तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकारी, राजकीय संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content