मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांकडून गावोगावी मोठमोठे बॅनर, फ्लेक्स, जाहिराती पाहायला मिळतात. परंतु मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव पुनर्वसन येथील जिल्हा परिषद शाळा याला अपवाद ठरली. ना जाहिरात, ना मोठे मोठे बॅनर, ना फ्लेक्स फक्त आणि फक्त शिक्षकांची कामावरील निष्ठा आणि गावकऱ्यांना व पालकांना जि.प.शाळेचे पटलेले महत्त्व यामुळे आज पालकांनी प्रवेशासाठी रांग लावून इयत्ता १ ली तब्बल एकाच दिवशी २० ऍडमिशन पूर्ण केल्या आहेत .
इयत्ता पहिलीत दाखल पात्र बालकांची शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत शाळेतील पहिले पाऊल या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये सकाळपासूनच इयत्ता पहिलीची दाखल पात्र बालके व त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एक एक करत पालकांची प्रवेशासाठी लांबच लांब रांग तयार झाली. या मेळाव्यात नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तयारी व पालकांना मार्गदर्शन असे एकूण 7 स्टॉल लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर घेण्यात आल्या. या एकाच दिवशी तब्बल २० मुलांचे इयत्ता 1 लीत प्रवेश निश्चित करण्यात आले.
शेवटी पालकांसोबत मुलांचे सेल्फी काढून माझा प्रवेश निश्चित असा बिल्ला लावून व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. व खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घघाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष वैशाली खोदले यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी मदन मोरे, केंद्रप्रमुख विजय दुट्टे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलकंठ भगत, सदस्य रवींद्र पाटील, मुख्याध्यापक अनिल पवार,शिक्षक भिका जावरे, सोमनाथ गोंडगिरे, गोपाल दुतोंडे, स्वाती भंगाळे, अंगणवाडी सेविका यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि.प.शाळा घोडसगाव येथील सर्व शिक्षक उपक्रमशील व मेहनती असून त्यांच्यामुळे तसेच पालक व गावकरी यांच्या सहकार्यामुळेच या शाळेचे रूप पालटले असून शाळेला संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळाला आहे. असे गौरवोद्गगार गटशिक्षणाधिकारी मदन मोरे यांनी काढले.