पुणे, वृत्तसंस्था | परळी येथे जाहीर मेळावा घेऊन पक्षाला आव्हान देणाऱ्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पंकजांनी परळीत घेतलेला मेळावा हा अस्तित्व टिकवण्यासाठी होता. त्या मेळाव्याची गर्दी गोपीनाथ मुंडेंच्या नावामुळे होती. पंकजांसाठी कुणीही गेले नव्हते,’ अशी टीका काकडे यांनी केली आहे.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काल परळी इथे पंकजा मुंडे समर्थकांचा मेळावा झाला. या मेळाव्यास भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री प्रकाश मेहता व अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना पंकजा व खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. दोघांचाही रोख देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
फडणवीस यांनी अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काकडे यांनी पंकजांवर थेट टीका केली आहे. ‘पंकजा मुंडे यांचा परळीत झालेला पराभव हा त्यांचा स्वत:चा होता. परळीतील मतदारांनीच तिथे मतदान केले होते. कुणी बाहेरचे मतदार तिथे आणले नव्हते. त्या स्वत: कुठेतरी कमी पडल्या म्हणून त्यांना मते मिळाली नाहीत. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी त्या आता दुसऱ्यावर खापर फोडत आहेत,’ असा टोलाही काकडे यांनी यावेळी लगावला.
‘भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे होते, ते पुण्यात लढले आणि विजयी झाले. मतदारांना विश्वास दिल्यामुळेच ते जिंकू शकले. पंकजांना ते जमले नाही. स्वत:चा मतदारसंघ सांभाळता येत नाही, त्याचा दोष दुसऱ्याला का देता?,’ असा सवाल काकडे यांनी केला. ‘पक्षात अपमान होणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, कालचा कार्यक्रम हा अस्तित्व टिकवण्यासाठी होता. केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमाखातर लोक तिथे जमले होते. पंकजांनी पक्ष आणि मुंडे यांचं नाव वगळून मेळावा घेऊन दाखवावा,’ असे आव्हानही त्यांनी दिले.
सर्व ओबोसी नेते नाराज नाहीत – बावनकुळे
विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही खडसे व मुंडे यांनी केलेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ‘भाजपमधील सगळेच ओबीसी नेते नाराज आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. पक्ष सत्तेत नसल्यामुळे आता जातीय राजकारण सुरू झाले आहे. पण जातीपातीने माणसे मोठी होत नाहीत. कर्तृत्वाने मोठी होतात,’ असेही ते म्हणाले. यावेळी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचेही त्यांनी कौतुक केले.