जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्यानगरातील अशोक नगर येथील नाभिक समाज विकास मंडळाच्यावतीने विठ्ठल रखुमाबाईसह संत शिरोमणी सेवा महाराज यांच्या मंदीर प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने शहरातील अयोध्या नगरातील अशोक नगर भागात विठ्ठल रखुमाई आणि संत शिरोमणी सेवा महाराज यांच्या मंदीराचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. विठ्ठल रखुमाईसह संत शिरोमणी सेना महाराज यांच्या मंदीर प्राणप्रतिष्ठान सोहळा घेण्यात येत आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अशोक नगरात शोभायात्रा व मंदीराचे वास्तू पूजन करण्यात आले. यावेळी समाजातील महिला व पुरूषांनी पारंपारिक पध्दतीने डोक्याला फेटा लावून नृत्य सादर केले.
मंदीर प्राणप्रतिष्ठान सोहळा हा १५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. बुधवारी १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पुजन व होम विधी होणार आहे. गुरूवार १४ एप्रिल रोजी मुर्तीची स्थापना आणि शुक्रवारी १५ एप्रिल रोजी मंदीराचा लोकार्पण सोहळा आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील भाविक आणि समाज बांधवांनी आयोजित सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक समाज विकास मंडळाचे युवा शहराध्यक्ष हर्षल मावळे, शहर कार्याध्यक्ष उदय पवार, युवा कार्यध्यक्ष बंटी ठाकरे, विक्की झुंझारराव, शहर सचिव विशाल निकम, सहसचिव विजय वाघ, प्रमुख संघटक संदीप वसाने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.