( प्रतिकात्मक छायाचित्र )
यावल (प्रातिनिधी) तालुक्यातील दहिगावजवळ चुंचाळे शिवारात गेल्या काही दिवसापासुन १० ते १५ फुट लांबीचा अजगर दोन लहान पिलांसह फिरतांना दिसुन आल्याने परिसरातील शेतमजुर व शेतकरी बांधव भयग्रस्त झाले आहेत. या अजगरांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात अधिक माहीती अशी की, दहिगाव येथील रहिवासी जिल्हा परिषदचे माजी शिक्षण समिती सभापती सुरेश देवराम पाटील यांच्या चुंचाळे शिवारातील केळीची लागवड केलेल्या शेतात व महेबुब खाटीक यांच्या शेताजवळच्या नाल्यात गेल्या काही दिवसांपासुन सुमारे १० ते १५ फुट लांबीचा अजगर दोन पिलांसह दिसुन आला आहे. या संपुर्ण परिसरात शेतकरी, शेतमजुर आणि या मार्गाने जाणारे वाटसरू या प्रकारामुळे चांगलेच धास्तावले आहेत. परिसरातील मजुर भितीपोटी कामास जाण्यास नकार देत आहेत. या संदर्भात शेतकरी व ग्रामस्थानी यावल पाश्चिम विभागाचे वन अधिकारी विशाल कुटे यांच्याशी संपर्क साधुन तात्काळ आपण वन विभागाच्या माध्यमातुन या अजगराचा व त्याच्या दोन पिलांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत कुटे यांनी शेतकऱ्यांना सांगीतले की, आपण हे दोन लोकसभा निवडणुकीच्या कामात असल्याने पुढील दोन दिवसानंतर आपण त्या अजगरास पिलांसह जेरबंद करू. तोपर्यंत आपण त्यांना कुठल्याही प्रकाराची इजा पोहोचवु नये किंवा त्यांना चिडवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.