पुणे जिल्हयातील विधानसभांची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली असून पुणे लोकसभा मतदारसंघात येणा-या सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार पंकजा मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विधानसभेच्या पदाधिका-यांची बैठक घेऊन पुण्यात काय होणार याचा अहवाल प्रदेश भाजपकडे सादर करणार आहेत.

भाजपच्या प्रदेश अधिवेशनात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन होईल असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. पण त्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. यासाठी संघटनात्मक पातळीवर भाजपने काम सुरु केले आहे. यासाठी भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन नेत्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे कसबा, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेची जबाबदारी दिली आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे शिवाजीनगर, वडगाव शेरी, कोथरूड या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर बारामतीमधील खडकवासला विधानसभा मतदारसंघही मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. मोहोळ यांनी कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली आहे. तर मुंडे यांच्या बैठका पुढील काही दिवसात होणार आहेत.

Protected Content