पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे विठुरायाची शासकीय महापूजा केली. त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृध्दीसाठी साकडे घातले. विशेष बाब म्हणजे याप्रसंगी शिंदे कुटुंबातील चार पिढ्यांचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीवरून थेट पंढरपूर येथे रात्री उशीरा दाखल झाले. आज पहाटे चार वाजता त्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. याप्रसंगी त्यांनी श्री विठ्ठल व रूक्मीणी यांना राज्यातील जनतेला सुख-समृध्दी मिळावी. चांगला पाऊस पडून आबादानी व्हावी यासाठी साकडे घातले. राज्यातील सर्वसामान्य लोक, बळीराजा, शेतकरी, शेतमजूर यांना सुखी ठेवण्यासह महाराष्ट्राला प्रगतीपथावरून नेण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या सहकार्यांनी दाखविलेल्या विश्वासमुळे आजचा दिवस उगवला आहे. आज आपण महापूजा करत असतांना शिंदे घराण्यातील चार कुटुंबांचे सदस्य उपस्थित होते. आपण आत्महत्यामुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.