पंढरपूर । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पंढरपूर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ते प्रचारासाठी पंढरपुरात आले आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होत आहे. यात महाविकास आघाडीतर्फे भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रचारासाठी खान्देशची मुलुखमैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांच्या आज दोन सभा होत आहेत. यातील एक सभा ही सकाळी भोसे ता. मंगळवेढा येथे तर दुसरी दुपारी तीन वाजता शीवतीर्थ पंढरपूर येथे होणार आहे.
दरम्यान, आज सकाळी ना. गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेनेचे स्थानिक जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण सर्व जण खर्या अर्थाने लोकशाहीवादी प्रणालीचे लाभ घेत आहोत. बहुजनांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणार्या बाबासाहेबांचे विचार अंमलात आणणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे. सध्या कोविडची आपत्ती सुरू असून राज्य सरकारने विविध नियम आखून दिले आहेत. या नियमांचे पालन करून आपण सर्वांनी साधेपणाने जयंती उत्सव साजरा करावा असे आवाहन ना. पाटील यांनी याप्रसंगी केले.