बुलढाणा येथे आदिशक्ति संत मुक्‍ताबाईची पालखी दाखल

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आषाढी एकादशी वारीसाठी श्री संत मुक्ताईंची पालखी परंपरेने कोथळी, मुक्ताईनगर येथून जुन्या मंदिरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या पालखी सोहळ्याचे प्रस्थान करून संत मुक्ताईची पालखी मलकापूर, मोताळा मार्गाने राजूर घाट, बुलडाणा येथे पोहोचली आहे.

प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघा राजुर घाट दुमदुमला होता. आज पालखी बुलडाणा येथे मुक्कामी असणार आहे. सकाळी पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो,  त्या संत मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. संत मुक्ताई संस्थानाच्यावतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यावर्षीचे हे 313 वे वर्ष आहे. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे.

संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत 33 दिवसांत तब्बल 750 किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो.

तर पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान असून मानाची दिंडी समजल्या जातेय. दिंडी सोबत चालणारे वारकरी उन, पाऊस , हवा कशाचीही तमा न बाळगता दिंडीसोबत चालतात. बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 8 दिवस पालखी चा मुक्काम असतो. ठिकठिकाणी पालखीचे भाविकांकडून स्वागत आणि भोजनाची व्यवस्था ही केल्या जाते आहे.

 

 

Protected Content