इस्लामाबाद वृत्तसंस्था । पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांतात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी असल्याची माहिती आहे. सादिकबाद तहसील क्षेत्रातील वल्हार रेल्वे स्थानकावर एका मालगाडी अकबर एक्सप्रेसने धडक दिली. मृतांमध्ये 9 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधिकारी रहिम यार खान उमर सलामत यांनी ही माहिती दिली आहे. या रेल्वे अपघातात अकबर एक्सप्रेसचे इंजिन पूर्णत: नष्ट झाले असून 3 बोग्यांचेही नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना सादिकबाद आणि रहिम यार खान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना मदतकार्य आणि रेल्वेगाडीतील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे डीओपी सलामत यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान इम्रान खान आणि राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही दु:ख व्यक्त करत मृतांना आदरांजली वाहिली. तसेच इम्रान खान यांनी रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने काम करण्याचे सांगितले आहे. तर, रेल्वे मंत्र्यांनीही या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.