धार्मिक स्वातंत्र्य नसलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा पुन्हा समावेश

imran khan

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | धार्मिक स्वातंत्र्य न देणाऱ्या देशांच्या काळी यादीमध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा पुन्हा एकदा समावेश केला आहे. ज्या देशांमधील नागरिकांना धार्मिक स्वातंत्र दिले जात नाही आणि धर्माच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जातो त्या देशांना या यादीमध्ये स्थान दिले जाते. मागील आठवड्यामध्ये अमेरिकेने ही यादी जाहीर केल्यानंतर आता पाकिस्तानने यावरुन भारतावर निशाणा साधला आहे. “अमेरिकेने भारताऐवजी आम्हाला काळ्या यादीमध्ये टाकले आहे,” असा कांगावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

 

स्थानिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या देशांच्या काळ्या यादीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकेने पाकिस्तानचा समावेश केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला असून याबद्दल त्यांनी थयथयाट केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही यादी आणि आमच्यावर केले जाणारे आरोप मान्य नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने उचलेले हे पाऊल वास्तवाला धरून नसल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. भारतामध्ये अल्पसंख्यांकाना त्रास दिला जातो, तरी या यादीमध्ये भारताचा समावेश करण्यात आलेला नाही. असा कांगावा करीत पाकिस्तानने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

“अल्पसंख्यकांना लक्ष्य करण्यासाठी भारतामध्ये एन.आर.सी. आणि सी.ए.ए. सारखे कायदे करण्यात येत आहेत. असे असतानाही भारताचा या काळ्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. यावरुनच काळी यादी तयार करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भेदभाव करण्यात आला असून यादी बनवताना एकतर्फी विचार करण्यात आला आहे,” असेही पाकिस्तानने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये म्हटले आहे.

हे देश आहेत यादीत :- अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या या वार्षिक यादीमध्ये पाकिस्तानबरोबरच इतर नऊ देशांचा सलग दुसऱ्यांदा समावेश करण्यात आला आहे. सुदान या एकमेव देशाला जुन्या यादीमधून वगळण्यात आले आहे. अमेरिकेने १८ डिसेंबर रोजी जारी केलेल्या या यादीमध्ये बर्मा, चीन, इरिट्रिया, ईराण, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, तझाकिस्तान आणि तुर्केमेनिस्तान या देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा १९९८ अंतर्गत या देशांचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ २००९ साली या यादीमध्ये भारताचा समावेश करण्यात आला होता.

Protected Content