जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिंगाईत येथील तरूणाच्या हत्ये प्रकरणी त्याचाच मित्र असणार्या इसमाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर ते जामनेर मार्गावर हॉटेल वृंदावन नजीक सोनाळा पहूर शिव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडा खाली शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू वाघ ( वय ३७ ) यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. मारेकर्याने निर्दयपणे प्रमोदच्या डोक्यात दगड टाकल्याने त्याचा अंत झाल्याचे निष्पन्न झाले होते.
या क्रूर हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.
एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन पाटील यांनी पथक तयार करून या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली. यात मयताच्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण केले. यातून मयत प्रमोद वाघ याचा मित्र रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप ( वय ४१, रा. शिंगाईत, ता. जामनेर ) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने प्रमोद उर्फ बाळू वाघ याची हत्या केल्याचे कबूल केले.
मद्यपींमध्ये झाला होता वाद
मारेकरी आणि मयत दोन्ही ऐकमेकांचे जीवलग मित्र होते. दोघांनी दारू पिल्यावर वडापाव वर ताव मारला . दारूच्या नशेत दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यावसान भांडणात झाले. मयताने आरोपीस काठीने मारहाण केली. याचा राग येऊन रवींद्रने त्याच्या डोक्यात दगड घातला. यात प्रमोद रक्ताने माखल्या गेला. घाबरलेल्या अवस्थेत रवींद्रने पुन्हा दोन घाव प्रमोदच्या डोक्यात घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मारेकऱ्याने १५ फूट अंतरावर मृतदेह फरफटत नेवून त्याचा मोबाईल व मोटर सायकल घेऊन पलायन केले. आरोपीच्या मोबाईल मधील तांत्रिक लोकेशन वरून तपास पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे व अभयसिंह देशमुख व एलसीबीचे प्रमुख किसनराव नजर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने केली.