भामट्यांनी सीसीटिव्ही सिस्टीमसह साडेपाच लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला

पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव – औरंगाबाद महामार्ग लगत असलेल्या नागवेली इलेक्ट्रिकल अँड सेल्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी सीसीटिव्ही सिस्टीमसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की , येथील रहिवासी राजू बाबुराव बारी यांचे जळगाव – औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गालगत नागवेली इलेक्ट्रिक नावाचे दुकान असून नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद करून ते घरी गेले. मात्र १९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पुढील शटर वाकवून व मागील चॅनेल गेटचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकानात असलेले २ लाख २५ हजार किमतीचे २५० किलो वजनाचे पितळी बुश, १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे कॉपर वायर बंडल , ४८ हजार रुपये किमतिचे तांब्याचे वायर बंडल , ८४ हजार ५०० रु . किमतीचे तांब्याचे भंगार तसेच २० हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह डीव्हीआर उपकरण असे जवळपास साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेत पोबारा केला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांच्यासह भरत लिंगायत ,रवींद्र देशमुख ,ईश्वर देशमुख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तपास कामी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते .याप्रकरणी दुकानाचे मालक राजू बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील दोन वेळा सदर दुकानात चोरीचे प्रयत्न झाले होते .

गस्त वाढविण्याची मागणी

दरम्यान खंडेराव नगर येथे गेल्या महिन्यात तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून विजय सुभाष पांढरे व मधुकर देशमुख यांच्या येथे घोरपडी करून अडीच लाखांचा ऐवज लंपास केला होता. तर ख्वाजा नगरातही अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र अद्याप पर्यंत या चोरयांचा तपास लावण्यात पहूर पोलिसांना अपयश आले. आता पुन्हा जळगाव-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या नागवेली इलेक्ट्रिक दुकानात अज्ञात चोरट्यांनी महामार्गालगत तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लंपास करून या चोरट्यांनी चोरीचा तपास लावण्यासाठी जणू पहूर पोलिसांना आवाहन केले आहे. दरम्यान सतत होणार्‍या चोर्‍यांमुळे जनता भयभीत झाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Protected Content