पहूर ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भंडार्याला धान्य दाळ-दाणा न दिल्यास तुमच्या कुटुंबातील कोणाचातरी मृत्यू होईल असा धाक दाखवून वाकोद येथील दोन जणांनी पहूर येथे संतोषी माता नगरात महिलांना भोंदू गिरी करून लुबाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
याबाबत सविस्तर वृत्त असे वाकोद येथील गोविंद गंगाराम जोशी आणि सुनील साकरू जोशी या दोघा तरुणांनी संतोषी माता नगरात महिलांना भंडार्यासाठी धान्यादी साहित्य द्या तसेच कुटुंबकलह थांबण्यासाठी सोन्याचा नाग घडवून द्या अशी मागणी केली. अगरबत्ती व धूप लावून महिलांकडून त्यांनी सहाशे रुपये लुबाडले. एवढेच नव्हे तर, पुढील अनर्थ टाळण्यासाठी सोन्याचा नाग दान द्यावा लागेल असे आमीष दाखविले. याबाबत महिला चर्चा करत असतांनाच या प्रकाराची परिसरातील नागरिकांना माहिती मिळाली. यामुळे लोकांनी या दोघा तरुणांना चांगलाच चोप देऊन त्यांना पोलिसांच्या हवाली करून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी देखील त्यांना पोलीसी खाक्या दाखवून समज दिली. दरम्यान, अशा भोंदू पासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी विशेषतः महिलांनी अशाप्रकारे कोणत्याही अनोळखी व्यक्तींना कोणत्याही प्रकारे आपल्या घरात प्रवेश न देता सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.