पहूर, ता .जामनेर-रविंद्र लाठे | काल येथे पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर आज पोलिसांनी ऍक्शन मोडवर येत बस स्थानक परिसरातील अतिक्रमण काढून टाकले. तर हल्लेखोर अजून देखील फरारच आहे.
पहूर बस स्थानक परिसरात काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तोंडापूर दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे आणि रवींद्र मोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्या गुंडाविरुद्ध पहूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन खडबडून जागे होत बस स्थानकावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने बस स्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे .तथापि पोलिसांवर हल्ला करणारे शेख फिरोज शेख सुपडू आणि ख्वाजा तडवी ( रा . ख्वाजा नगर ) पहूर पेठ हे दोघे आरोपी मात्र अद्यापही फरारच आहेत .
काल शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पहूर पोलीस ठाण्याअंतर्गत तोंडापूर दुरक्षेत्राचे कर्मचारी अनिल सुरवाडे आणि रवींद्र मोरे हे पहूर बस स्थानकावर असताना त्यांनी दोन युवकांना रस्त्यात गाडी लावू नका असे सांगितल्याचा राग येऊन त्यांनी चक्क पोलिसांवरच प्राण घातक हल्ला केला . यात पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागल्याने त्यांना प्रथमोपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यानंतर जळगाव येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . तसेच अनिल मोरे यांनाही गुंडांनी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला होता.
याप्रकरणी रात्री उशिरा पहुर पोलीस ठाण्यात चालक पहूर पोलीस स्टेशन रविंद्र रूपांतर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख फिरोज शेख सुपडू आणि खॉजा तडवी यांच्याविरुद्ध भादंवि ३५३,३३२,३३३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे .दरम्यान पहूर पोलीस प्रशासनाने आज सकाळी बस स्थानक परिसरातील हातगाड्यांचे अतिक्रमण काढल्याने एक प्रकारे कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ’आरे ’ला ’कारे’ चे प्रत्युत्तरच दिल्याचे बस स्थानकावर चर्चिले जात आहे.
पोलीस प्रशासनावर झालेला हल्ला चुकीचा असून अशा भ्याड हल्ल्याचा सुज्ञ नागरिकांनी निषेध केला आहे . दरम्यान आरोपी फरारी असल्याने त्यांना त्वरित जेरबंद करण्याची मागणी देखील नागरिकांमधून होत आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे व सहकारी करीत आहेत .
रात्री १० नंतर दररोज दुकाने बंद करण्याची मागणी
दरम्यान काल रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान पोलिसावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच बस स्थानक परिसरात रात्री उशिरापर्यंत अनेक दुकाने चालू राहत असल्याने त्यामुळे बस स्थानक परिसरात नेहमीच गर्दी असते भविष्यात पहूर बस स्थानक परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दररोज रात्री दहा वाजेनंतर बस स्थानक परिसरात चालणारे सर्व व्यवसाय बंद करण्यात यावे अशी मागणी पोलीस अधिकार्यांकडे सुज्ञ नागरिकांनी केली आहे.