पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । आपल्या व्हाटसअॅप अकाऊंटवर ‘भावपूर्ण श्रध्दांजली’ असे स्टेटस ठेवून येथील एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबतसविस्तर वृत्त असे कि , पहूर कसबे येथील लेले नगर भागात राहणार्या आकाश रवींद्र बावस्कर (वय २१) या तरुणाने राहत्या घरात छताला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. विशेष बाब म्हणजे
गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्याने दुपारी ४. १७ मिनिटांनी ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे स्टेटस ठेवले आणि काही मिनिटातच त्याने घराच्या वरील मजल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये छताला गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपवली.
घरातील लोकांनी त्याला छताला लटकलेल्या अवस्थेत पाहून ते भयभीत झाले. त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. लगेच शेजारील रहिवाशांनी त्याला पहूर ग्रामीण रुग्णालयात नेले . ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी त्याला मयत घोषित केले.
मयत आकाश बारावी नंतर पोलीस व सैन्य भरतीची तयारी करत होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या आकाशच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांसाठी आकाशच कोसळले. त्याचा मृतदेह पाहून त्याच्या आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. मित्र परिवारामध्ये तो एक मनमिळावू स्वभावाचा मित्र म्हणून परिचित होता .परंतु त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले ? हे मात्र समजू शकले नाही .त्याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे .त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पहूर ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदनासाठी आकाशचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सरपंचपती शंकर जाधव , उपसरपंच राजू जाधव, माजी सरपंच लक्ष्मण गोरे , ग्रामपंचायत सदस्य सोनू बावस्कर , शिवाजी राऊत यांच्यासह गावातील पदाधिकारी, ग्रामस्थांसह नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. खरतर पहूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा मिळून दोन वर्ष होत आहेत. तरीही येथे एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्यांची सर्व ४ पदे रिक्त आहेत .रुग्णालयातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची नितांत गरज आहे.