पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पेट्रोलपंपच्या नोझल मशिनच्या प्रमाणपत्रासाठी सहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणार्या पाचोरा येथील वैद्यमापन शास्त्र विभागाच्या निरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, पहूर येथील एका पेट्रोलपंप धारकाला आपल्याकडील चार नोझल मशिनचे स्टँपींग करून प्रमाणपत्र हवे होते. या संदर्भात त्यांनी पाचोरा येथील वैद्यमापन शास्त्र विभागाकडे अर्ज केला. येथील निरिक्षक विवेक सोनू झरेकर ( वय ५४) यांनी त्यांना प्रत्येक नोझलसाठी पंधराशे अशा एकूण सहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जळगाव येथील कार्यालयाशी संपर्क साधला.
एसीबीच्या कार्यालयाने पथक तयार करून सापळा रचला. दरम्यान, आज विवेक सोनू झरेकर यांनी पहूर ते जळगावच्या दरम्यान असणार्या हॉटेलवर सहा हजार रूपये स्वीकारताच त्यांना पथकाने रंगेहात अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव व एन.एन.जाधव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे यांच्या पथकाने केली.