अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरणाच्या कामासाठी धरण जन आंदोलन समितीच्या वतिने दि १९ फेब्रुवारी पासून साखळी ऊपोषणाला बसणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी कुलगुरू प्रा शिवाजीराव पाटील देविदास देसले आदी उपस्थित होते. पाडळससे धरण २० वर्षापासून अपूर्ण आहे. या धरणाचा फायदा अमळनेर तालुक्यासह ४ तालुक्यांना होणार आहे. परंतू आता साडेचार वर्षा पासुन केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. युद्ध पातळीवर धरण पुर्ण व्हायला पाहिजे होते.तसे झालेले नसल्याने शासनाला जाग येण्यासाठी हे आंदोलन तीव्र करणार आहेत अशी माहिती पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे शहरातील मामा ट्रान्सपोर्ट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी दिली.
पाडळसरे धरणासाठी पाच तालुक्यातील सर्व जन सामान्यांनी ५ एप्रिल २०१८ रोजी प्रचंड मोर्चा काढला होता. त्यात भाजपाचे पदधिकारी यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे लाईव्ह भाषण ऐकविले व जाहीरपणे जनतेला पूर्णपणे आश्वासन दिले होते. यानुसार १५ दिवसात टी.ए.सी. मंजुरी येईल असे सांगण्यात आले होते. त्यास आज १० महिने झाले असले तरी मंजुरी मिळालेली नाही. यातच केंद्राकडून बळीराजा नाबार्ड साऱख्या योजनेतून एकरकमी निधी देवू असे सांगून पाने पुसली आहेत. प्रत्यक्ष केंद्राने ही जबाबदारी राज्य शासनावर टाकली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वरखेडी,लोंढे,शेळगाव बॅरेज, सुरवाडे-जामफळ यांना भरघोस निधी दिला. मात्र पाडळसरे धरणास एक दमडीही का दिली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यानंतर ६ ऑगस्ट २०१८ रोजी समितीने भिक मांगो आंदोलन केले होते. आता आता पाचही तालुक्यातील जनता चिडलेली आहे. त्याची जाण ठेवा, या साखळी उपोषणामुळे या सरकारला जाग येईल अशी आशा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
या पत्रकार परिषदेस पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे कार्यकर्ते डी एम पाटील,अजय पाटील,सतीश पाटील,सुनील पाटील,देविदास देसले आदी उपस्थित होते. त्यांनी जनतेने,शेतकरी,व्यापारी यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.