पाचोरा येथे गणपती विसर्जनाला वरुणराजाचीही हजेरी 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यात व शहरात गणेश विसर्जनापूर्वी सायंकाळी सहा वाजता विजेच्या कडकडासह वरुण राजाचे सरी बरसू लागल्या. याचवेळी गणेश भक्तांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणूकीला सुरवात केली होती. पाऊस सुरू असतांनाही गणेश भक्तांनी ट्रॅक्टर, रिक्षा, स्वत:ची चार चाकी वाहने, मोटारसायकली वरुन मोठ्या उत्साहात नाचत – गाजत, गुलाल उधळीत मिरवणुकीत सहभाग घेतला.

गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र यावर्षी महिला, युवक, युवतींसह जेष्ठ नागरिकांचीही उत्साहात भर पडली.

शहरातील बहुतांशी गणेशाचे बहुळा प्रकल्पात विसर्जन करण्यात आले. काहींनी भडगाव रोडवरील तितूर नदीत, गिरणा, तितूर नदीच्या बांबरुड (महादेवाचे) येथील संगमावर, काहींनी पुनगाव व गिरडजवळील गिरणा नदीपात्र तर काहींनी हिवरा नदीपात्राच्या आय. टी. आय. जवळील डोहात विसर्जन केले.

पाचोरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बहुळा प्रकल्पावरील पुलावर नगरपालिका प्रशासनाने एक पेंडाल टाकुन पाच पट्टीचे पोहणारे, दोन ट्युप, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहनासह मोठ्या प्रमाणात पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पाचोरा येथील मिरवणुका छत्रपती संभाजी महाराज चौक, भुयारी मार्ग, जामनेर रोड, बाहेरपुरा कृष्षापुरी, गोराडखेडा येथून बहुळा प्रकल्पाजवळ नेण्यात आल्या.

तर भडगाव रोडवरील मिरवणुका जारगाव चौफुली मार्गे गोराडखेडा येथून बहुळा प्रकल्पाजवळ नेण्यात आल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

पाचोरा नगरपरिषदेने राजे संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात, जारगाव चौफुली, कामगार मैदान, गांधी चौक, जळगांव चौफुली, बहुळा प्रकल्पा सह आठ ठिकाणी मुर्ती संकलन व निर्माल्य संकलन केंद्र तैनात केले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाचोरा दाहुदी बोहरा समाज बुराहनी गार्डस् इंटरनॅशनलतर्फे मिरवणूकीतील भाविकांना शरबत वाटप करण्यात आले.

एकुणच अतिशय उत्साहात व अश्रु नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याच्या आशेवर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

Protected Content