पाचोरा प्रतिनिधी | बनावट कागदपत्रे तयार करून संस्था हडपण्याच्या प्रकरणी आधी अंतरीम अटकपूर्व जामीन मिळालेल्या आठ संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील अनुजा प्रतापराव तावरे रा.पाचोरा ह्या नुतन महिला सर्वोदय बाल विकास संस्था, पाचोरा या संस्थेची सन – २०१४ पासून ते आजतागायत संस्थेची सचिव आहे. तसेच सदर संस्थेची अध्यक्ष म्हणून माधवी प्रतापराव तावरे हया काम पहात आहे. सदर संस्थेचे कार्यकारी मंडळात माधवी प्रतापराव तावरे (अध्यक्ष), रेखा दिनेश जाधव (उपाध्यक्षा), अनुजा प्रतापराव तावरे (सचिव), सुलोचना चंद्रकांत नरके (सदस्या), वैशाली दिनेश जाधव (सदस्या), शैला नंदकुमार वडनेरे (सदस्या), मंगला प्रकाश सोनवणे (सदस्या), संगिता धर्मराज शिंदे (सदस्या), नलिनी अमोल पाटील (सदस्या) असे मागील अनेक दिवसांपासून संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, रुपाली प्रविण साळुंखे, सविता रामकृष्ण पाटील, मनिषा प्रमोद जोशी, मनिषा प्रविण जोशी, अनिता अनंत साळुंखे, सरला ओमप्रकाश पाटील, हेमांगी उमेश जोशी, शैला शंकर जोशी यांनी धर्मदाय आयुक्त, जळगाव यांच्याकडे खोटा व बेकायेदशिर बदल अर्ज क्रं. १८५ / २०२१ हा दाखल केलेला होता. सदरच्या बदल अर्जाची माहिती अनुजा प्रतापराव तावरे यांना झाल्यानंतर त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन, पाचोरा, ता.पाचोरा, जि. जळगाव यांच्याकडे दि. २८ जुलै २०२१ रोजी तक्रार (क्रं .३२७/ २०२१) दाखल केली होती.
या तक्रारीमध्ये वरील रूपाली प्रविण साळुंखे व इतर ८ यांच्या विरूध्द आय. पी. सी. कलम – ४०६, ४०५,४१७, ४२०, ४६३, ४६५, ४६८, ४६६, ४७१ आणि १२० (ब) व कलम – ३४ प्रमाणे यांच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हा नोंदविल्यानंतर रूपाली प्रविण साळुंखे सह ८ जणांनी यांनी जिल्हा व सत्र न्यायाधिश यांच्याकडे अटकपूर्व जामिन अर्ज नं. ६७० /२०२१ दाखल केलेला होता. सदरच्या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी संस्थेचे सचिव अनुजा प्रतापराव तावरे हया फिर्यादी म्हणून वरील आरोपींनी केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जास हरकत घेतली. अनुजा प्रतापराव तावरे यांनी सदर अर्जाच्या निशाणी ९ ला शपथपत्र दाखल केले.
सत्र न्यायाधीश यांनी आरोपींच्या जामिन अर्जावर आदेश करतांना असे नमुद केले आहे की, अर्जदार /आरोपी रूपाली प्रविण सांळुखे यांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे बदल अर्ज क्रं. १८५ / २०२१ हा दाखल केलेला होता. सदरच्या बदल अर्जास अनुजा प्रतापराव तावरे यांनी नाशिक येथील सह धर्मदाय आयुक्त, नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे अपिल नं. ४६ /२०२१ दाखल केलेले होते. सदरच्या अपिलावर दि. २९ जुलै २०२१ रोजी वरिष्ठ न्यायालयाने निकाल देवून अनुजा प्रतापराव तावरे यांचे अपील मंजुर करून अर्जदार / आरोपी यांनी धर्मदाय आयुक्त, जळगाव यांच्याकडे केलेला बदल अर्ज रद्द केला. अटकपूर्व जामिन अर्जाच्या सुनावणी अंतर्गत अर्जदारांच्या वकीलांनी अर्जदार या स्त्रिया असल्यामुळे त्यांचा अटकपूर्व अर्ज मंजुर करण्यात यावा, तसेच कोर्टासमोर सर्व दस्तऐवज उपलब्ध असल्यामुळे अर्जदार /आरोपींची अटकेची आवश्यकता नसल्यामुळे आरोपींना जामिन देण्याची विनंती केली.
अनुजा प्रतापराव तावरे यांनी नि.१ मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये कथन केलेले की, अर्जदार / आरोपींनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून त्यांनी नोटरी ऍड. श्रीमती कालिंदी चौधरी यांच्या खोटया सहया व शिक्क्यांचा वापर केलेला असून अन्य ठिकाणी देखील अनुजा प्रतापराव तावरे व त्यांच्या मंडळातील इतर सदस्यांच्या सहया केलेल्या अराल्या कारणाने अर्जदार /आरोपींना अटकेची आवश्यकता आहे. त्यामुळे अर्जदार /आरोपींचा जामिन अर्ज रद्द करण्यात यावा. जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी अर्जदार / आरोपींच्या अर्जावर दि. १ रोजी अंतिम निकाल देतांना अर्जदार /आरोपींना अटकपूर्व जामिन अर्ज रद्द केलेला आहे. तसेच अर्जदार व आरोपींना दि. १४ ऑगस्ट २०२१ रोजी जो अंतरीम अटकपूर्व अर्ज मंजुर केलेला होता, तो रद्द केलेला आहे. अनुजा प्रतापराव तावरे यांच्या वतीने नाशिक येथील सह धर्मदाय आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपिल नं. ४६ /२०२१ चे कामी धुळे येथील ऍड. एम. एम. भावसार यांनी काम पाहिले. तसेच जळगांव येथील जामिन अर्ज क्रं. ६७० / २०२१ चे कामी अनुजा तावरे यांच्या वतीने ऍड. मिलींद पाटील तर शासनाच्या वतीने सरकारी वकील म्हणून ऍड. श्रीमती बोरसे यांनी कामकाज पाहिले.