जळगाव प्रतिनिधी । चारीत्र्याचा संशय घेवून तलाठी पत्नीचा खून करणा-या पोलीस पती नितीन मोतीराम पवार याचा जामीन अर्ज आज मंगळवार 6 एप्रिल रोजी न्यायाधीश सी.व्ही.पाटील यांनी फेटाळून लावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील मौर्या कन्ट्रक्शन मधील रहिवासी तथा तालुक्यातील माहेजी येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अरुणा नितीन पवार (वय – ४२) यांचे भाऊ हे मुंबई येथे पोलिस दलात सेवेत असतांना त्यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. भावाच्या मृत्यु संबंधीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी अरुणा ह्या मुंबई येथे गेल्या असता त्यांची भेट पोलिस दलात नोकरीस असलेले नितीन मोतीलाल पवार यांचेशी झाली. नितीन यांने अरुणा हिचा विश्वास संपादन करुन माझा पहिला विवाह झाला असुन माझी पत्नी माझ्यासोबत राहत नाही व मी पण आपल्या समाजाचा आहे असे खोटे सांगुन अरुणाला विवाहाची मागणी केली. यानंतर त्यांचा २२ सप्टेंबर २०१७ मध्ये विवाह झाला होता.
विवाहानंतर नितीन पवार हा नियमित अरुणा हिच्या चारित्र्यावर संशय घेत असुन तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत असे. अरुणा हिने सदरचा प्रकार आपल्या आईस सांगितल्यानंतर आईने नितीन याच्या स्वभावात बदल होईल असे सांगितले. अरुणा ही तलाठी पदावर कार्यरत असल्यामुळे तिला तहसिल कार्यालयातुन ऑफिस कामांबाबत मिटींग संदर्भात व शेतकर्यांचे फोन येत असत. याचा नितीनला राग येवुन तिच्या चारित्र्यावरच संशय घेत असे. शेवटी याच विषयावरुन नितीन व अरुणामध्ये २९ नाव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास भांडण झाले त्यात नितीन मोतीलाल पवार याने अवजड वस्तु डोक्यात मारुन खुन केला. याप्रकरण त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्याने जिल्हा न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी कामकाज होवून न्यायाधीश सी.व्ही.पाटील यांनी तो जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याप्रकरणी सरकार पक्षाकडून ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.