पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील खुल्या भुखंडांचे सुशोभीकरण होणार असून यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे.
आमदार किशोर पाटील यांनी शिवालय या आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहरासाठी प्राप्त झालेल्या निधीबाबत माहिती दिली. याप्रसंगी मुकुंद बिल्दिकर, डॉ. भरत पाटील, राम केसवानी, शरद पाटे, वाल्मिक पाटील, किशोर बारावकर, राजू पाटील व प्रवीण ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील म्हणाले की, खुल्या भूखंडांचे सुशोभिकरणांतर्गत पाचोरा शहरातील २५ खुल्या भूखंडांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून महिन्याभरात कामांना सुरूवात होणार आहे. शहरात १०० खुले भुखंड असून ५० भूखंडांचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले. दुसर्या टप्प्यात २५ खुल्या भूखंडांसाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून महिन्याभरात या कामांना गती मिळणार आहे. यात विष्णु नगर, भास्कर नगर, कालिका नगर, गाडगेबाबा नगर, शांतीनगर आदर्श नगर, जिजामाता कॉलनी, बळीराम नगर, ओ. ना. वाघ नगर, सदगुरू नगर, मल्हार नगर, स्वामी समर्थ नगर, दुर्गा नगर, कृष्णापुरी, स्वामी समर्थ नगर, रामदास ठाकरे नगर, नारायण नगर, अब्दुल हमीद नगर, आनंद नगर, चिंतामणी कॉलनी, पवन नगर, साई पार्क, वृंदावन कॉलनी, दामजी नगर व मयुर पार्क येथील भूखंडांचा विकास होणार आहे.
या कामांमुळे शहराच्या सौंदर्यासह विकासात भर पडणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर पाटील यांनी या पत्रकार परिषदे केले.