पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील नदीपात्रात मध्यप्रदेशातील एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, तिक्या आखाडे (वय – १६ वर्ष) रा. उपडी ता. सेगांव जि. खरगोन (मध्यप्रदेश) हा युवक शेत मजुरी करण्यासाठी आलेल्या आपल्या परिवारा सोबत खेडगाव (नंदीचे) ता. पाचोरा येथे आला होता. दरम्यान काल दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तिक्या आखाडे हा नदी पात्र ओलांडत असतांना अचानक त्याचा पाय घसरला व तो खोल पाण्यात पडला. हा प्रकार त्याचे सोबत असलेल्या मुलांनी घराच्या मंडळींना व परिवारास सांगितल्यानंतर तिक्या आखाडे याचा शोध सुरू झाला. मात्र काही वेळात अंधार पडल्याने शोध कार्यास अडथळा निर्माण होवु लागला.
दरम्यान, दि. १२ ऑक्टोबर रोजी पहाटेच पुन्हा शोध कार्य सुरू झाले असता सकाळी ८ वाजेच्या सुमारास तिक्या आखाडे याचा मृतदेह आढळून आला. त्यास ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी तिक्या आखाडे यास मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करित आहेत. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित सांळुखे यांनी केले. दरम्यान, या मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या परिवारावा वज्राघात झाला असून यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.