देवळाली-भुसावळ रेल्वे गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रेल्वे ग्राहक समितीच्या बैठकीत येथील दिलीप पाटील यांनी भुसावळ ते देवळाली रेल्वे गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.

मंडल रेल उपयोगकर्ता सलाहकार समितीची १६९ वी बैठक २० डिसेंबर रोजी भुसावळ रेल मंडळ येथे मंडल रेल प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात समितीच्या १२ सदस्यांनी आपापल्या स्टेशन वरील समस्या भुसावळ मंडळ अधिकार्‍यांसमोर मांडल्या. यात दिलीप पाटील यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या.

यात प्रामुख्याने पाचोरा स्टेशन वरील विविध समस्या जशा की संपूर्ण रेल्वे जंक्शन स्टेशन सी. सी. टी. व्ही. कॅमेरा कक्षेत यावे, स्वयंचलित जिना, डिजीटल कोच पोजिशन, वायफाय सुविधा, दादरा, स्टील रेलिंग, वाटर बेसिन समस्या, प्लॅटफॉर्मवर दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प व्यवस्था, पी. ए. अनाऊन्स सिस्टम कार्यरत समस्या, स्टेशन पार्किंग समस्या या लक्षात आणून देत तात्काळ सर्वच समस्यांचे निराकरण करून मिळावेत अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, चाकरमान्यांसह, व्यापारी विद्यार्थी व ग्रामीण जनतेसाठी महत्व असलेली ११११३ देवळाली भुसावळ पॅसेंजर /एक्स्प्रेसला आपल्या पुर्व वेळेवर म्हणजेच देवळाली येथून पहाटे ४ : ४० ला सुरू करत देवळाली भुसावळ मधील प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पाचोरा जंक्शनवरील या सर्व समस्यांची फाईल बंद करतो पण आमची सर्वसामान्य जनतेची जिवनवाहिनी ही ट्रेन पूर्ववत कराच अशी विनंती दिलीप पाटील यांनी केली. यावर आपल्या पाचोरा जंक्शन वरील समस्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे लेखी व तोंडी स्वरूपाचे आश्वासन भुसावळ मंडळ अधिकार्‍यांकडून दिलिप पाटील यांना देण्यात आले.

या बैठकीत समिती सदस्यांसह भुसावळ मंडळ अधिकारी एस. एस. केडीया, सुनील कुमार सुमन, कौशेलेंद्र कुमार, डॉ. शिवराज मानसपुरे, नवीन पाटील, डॉक्टर संजीव. एन. के, डॉक्टर आर. एन. मीना, सी.वी. कदम, एम. पी. खोब्रागडे, जे. पालटा सिंह, निखिल सिंह, हिमांशू रामदेव, अरशद आलम खान, तरुण दंतोतिया, एस. एच. राव यांचेसह अधिकारी उपस्थित होते.

Protected Content