टोकियो वृत्तसंस्था | बॅडमिंटनच्या काल झालेल्या सामन्यात निराशाजनक प्रदर्शन करणार्या पी.व्ही. सिंधू हिने आज चमकदार कामगिरी करत विजयासह कांस्यपदक पटकावले आहे.
काल रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी व्ही सिंधूला उपांत्य फेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळाल्यानंतर ताय झूनं दुसर्या गेममध्ये तुफान खेळ केला. तैपेईची खेळाडू सिंधूला तिच्या तालावर नाचवताना दिसली अन् त्यामुळेच भारतीय खेळाडूंकडून चुंकामागून चुका होत गेल्या. उपांत्य फेरीतील पराभवानंतर सिंधू सूर्वणपदकाच्या शर्यतीतून बाद झाली असली तरी तिला कांस्यपदक जिंकण्याची संधी होती. आणि आजच्या सामन्यात तिने ही संधी घालवली नाही. यामुळे आता मिराबाई चानू हिच्यानंतर ती टोकियो ऑलिंपीकमध्ये पदक जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली आहे.
आज सिंधूचा चीनच्या हे बिंजाओ या खेळाडूशी सामना झाली. याच्या पहिल्या सेटमध्ये सिंधूने २१-१३ अशा प्रकारे सहजपणे बाजी मारली. तर दुसर्या सेटमध्येही तिने २१-१५ अशी बाजी मारली. या माध्यमातून दोन ऑलींपिक पदके मिळवणारी सिंधू ही भारताची पहिली महिला खेळाडू बनली आहे. याआधी मल्ल सुशील कुमार याने २००८ साली कांस्य तर २०१२ साली रौप्य पदक पटकावले होते.