नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी केंद्रीय अर्थ मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडियाच्या ईडीशी संबंधित प्रकरणात त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.
चिदंबरम यांनी ८ नोव्हेंबर रोजी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर आज न्या. सुरेश कैट यांच्यापुढे सुनावणी झाली असता त्यांनी जामिनास नकार दिला. तपास सध्या प्रगतीपथावर असून आता जामीन दिल्यास त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत हायकोर्टाने चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टाने चिदंबरम यांची २७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना आणखी काही काळ कोठडीतच काढावा लागणार आहे. चिदंबरम यांना सध्या तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे.