कोविशिल्ड नावाचा वाद आता न्यायालयात

नांदेड । एकीकडे सिरम इन्स्टीट्युट लसीकरणासाठी परवानगीचे प्रतिक्षेत असतांना त्यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचे नाव वादाच्या भोवर्‍यात सापडले असून नांदेडच्या एका कंपनीने या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील संशोधित लस अंतीम टप्प्यात आहे. या लसीचे नाव कोविशिल्ड असे ठेवण्यात येणार आहे. परंतु, क्युटीस बायोटेक कंपनीच्या म्हणण्यानुसार कोविशिल्ड या नावाचा वापर करण्यासाठी ट्रेडमार्क कंपनीकडे ६ जून २०२० रोजीच अर्ज केलेला आहे. ट्रेडमार्क कायद्यानुसार ज्यांनी अर्ज अगोदर दाखल केला त्यालाच या नावाचा ट्रेडमार्क देण्यात येतो. तसेच क्युटीस बायोटेकची कोविशिल्ड या नावाने वेगवेगळी उत्पादने बाजारात आहेत. ट्रेडमार्क संचालकांनीही सिरम इन्स्टिट्यूटला पाठविलेल्या अहवालात या गोष्टीचा उल्लेख केला आहे.

या अनुषंगाने सिरम इन्स्टिट्यूट तयार करीत असलेल्या कोरोनावरील लसीला कोविशिल्ड नाव वापरण्यास आमचा आक्षेप आहे, अशा आशयाचा दावा नांदेडच्या क्युटीस बायोटेक या कंपनीने नांदेडच्या जिल्हा न्यायालयात सादर केला आहे. जिल्हा न्यायालयाने सिरम इन्स्टिट्यूटला नोटीस बजावण्याचे आदेशही दिले आहेत. पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद बंग व अ‍ॅड. आदित्य राजशेखर काम पाहत आहेत.

Protected Content