भीषण अपघातात जखमी झालेल्या तिघांपैकी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील पुजा कॉम्प्लेक्स समोरील रोडवर कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार ही रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळल्याने तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. यातील मेहरा मयंक चैनसिंग वय-२४ रा. खडका चौफुली, भुसावळ याचा उपचारादरम्यान बुधवारी २० डिसेंबर रोजी मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील पुजा कॉम्प्लेक्स समोरील रोडवर मंगळवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता कार क्रमांक  (एमएच ०४ सिटी ८६१०) ही भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करतांना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या कंटेनर क्रमांक (एमएच-१९ सीवाय ७०८५) आदळली होती. यात मेहरा मयंक चैनसिंग, रोशन मकारे आणि आवेश (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. भुसावळ हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.  यातील मेहरा मयंक चैनसिंग या तरूणाचा उपचारादरम्यान बुधवारी २० डिसेंबर रोजी मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत मेहरा मयंक चैनसिंग हा सीडीएस परिक्षेची तयारी करत होता. त्यांच्या पश्चात आईवडील, आजी आजोबा आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

Protected Content