मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा– आपल्या सरकारचे सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य असल्याचे प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधतांना केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी त्यांच्या सरकारने केलेली कामे आणि भविष्यातील कामांच्या नियोजनाचा उहापोह केला. ते म्हणाले की, आमच्या सरकारने सणासुदीच्या कालखंडात आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. चांगल्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. विविध योजनांना गती देण्याचा प्रयत्न केला. सरकारला आणखी मजल गाठायची आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बाळासाहेब नेहमी सांगायचे, समाजकारण आणि राजकारण यामध्ये समाजकारणाला प्राधान्य द्या. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचितांच्या विकासाचा आमचा ध्यास आहे. हे सरकार प्रत्येकाच्या मनातलं सरकार आहे. हे आपलं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आमची वाटचाल देखील अशीच सुरू असल्याचही शिंदे म्हणाले. आपण ज्येष्ठांसाठी मोफत एसटी प्रवास मोफत केला आहे. दिवाळीसाठी सामान्यांना आनंदाचा शिधा दिला. आपत्तीग्रस्तांना भरघोस मदत केली. यामुळे ३० लाख शेतकर्यांना मदत मिळणार आहे. भूविकास बँकेचे कर्ज घेणार्यांना कर्जमाफी दिली. तसेच प्रोत्साहनपर अनुदानही दिल्याचं, शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी समृध्दी महामार्ग लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, राज्यातील ७५ हजार पदाच्या भरतीची घोषणा झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार आहे. चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरू आहे. तसेच शेतकर्यांच्या कर्जमाफी, पोलिस भरती यासाठी प्रयत्नशील असून आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळविणार्यांना खेळाडूंना मदत करणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.