जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचलीत ओरिऑन इंग्लिश मेडीयम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये निर्भया पथक यांचेकडून मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या काळात शाळकरी मुलींना शाळेत येणे जाणे फार कठीण झाले आहे. त्यासाठी निर्भया पथकाने आज मुलींना मार्गदर्शन केले.
रामानंद नगर पोलिस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांनी प्रत्यक्ष मुलींना प्रश्न विचारले आपल्याला रिक्षावाले अंकल, रस्त्यावरील लोक यांच्यापासून काही त्रास होतो का? कुणी तुम्हाला घेवून जाण्याचा प्रयत्न करतो का ? किंवा तुम्हाला काही समस्या असतील तर त्या आमच्या जवळ बिंधास्त सांगा त्यावेळी काही मुली त्यांचे जवळ आल्या व त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. काळे यांनी त्यांच्या समस्यांचे निवारण केले.
त्यानंतर मंजुळा तिवारी निर्भया पथक प्रमुख यांनी सुध्दा मुलींना विचारणा केली. तुम्हाला शाळेच्या आवारात किंवा आवाराच्या बाहेर कुणी त्रास देतो का? शाळेतील शिक्षक असो, शिपाई असो यांच्यापासून छेडखानी होते का? असे प्रश्न त्यांनी मुलींना विचारले. मुलींनी त्यांना उत्तरे हि दिली. तसेच मोठया मुलींना सल्ला दिला. तुमच्यापेक्षा लहान मुलींना बहिणीप्रमाणे वागणूक द्या. त्याचप्रमाणे तुम्ही शाळेत राष्ट्रीय प्रतिज्ञा घेता त्यामध्ये तुम्ही म्हणता सारे भारतीय माझे भाऊ आणि बहीण आहेत. त्याप्रमाणे वागा. वर्गातील सर्व मुल व मुली हे भाऊ बहिण असतात असा उल्लेख त्यांनी केला. निर्भया म्हणजे मुलींना, मुलांना प्रतिबंध, सुरक्षित रहा, सुरक्षित व्हा असा आहे. त्यांनी प्रत्येक मुलींना त्यांचे मोबाईल नंबर व 101 हा नंबर त्यांनी दिला. व काहीही घटना घडली तर आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करा असा सल्ला दिला. त्याचप्रमाणे स्वतःचे रक्षण कसे करावे यासाठी सुध्दा उपाय सांगितले.
आम्ही आपल्यासाठी 24 तास उभे आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली.या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य संदीप साठे, उपप्राचार्य चंद्रकला सिंग, स्मिता कुलकर्णी, कांचन काळे, (पी. एस. आय रामानंद पोलिस स्टेशन) मंजुळा तिवारी (निर्भया पथक प्रमुख), एल. पी. सी. छाया पाटील (रामानंद पोलिस स्टेशन), उषा सोनवणे (निर्भया पथक), अभिमन्यु इंगळे (ए. एस. आय) यांची उपस्थिती लाभली.