जिल्हाभरात 21 ऑगस्टपासून ऑनलाइन शिक्षण परिषदेचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । कोविड काळातील माझ्या शाळेतील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण आणि राबवण्यात आलेले सर्वोत्तम उपक्रम या संदर्भातील चर्चा व संकलनासाठी दि. 21 ते 29 ऑगस्ट 2020 दरम्यान जिल्हाभरातील संपूर्ण तालुक्यातील केंद्रामध्ये ऑनलाईन शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डायट प्राचार्य डॉ. मंजूषा क्षीरसागर यांनी सांगितले.

सध्या संपूर्ण जिल्हाभरातील तालुकावार गुणवत्ता कक्षाच्या ऑनलाईन मिटिंग सुरू आहेत. त्यातील जळगाव तालुक्यासाठी आयोजित मीटिंगमध्ये डॉ. क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी डायट अधिव्याख्याता प्रा. प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक करून गुणवत्ता कक्षाच्या मीटिंग आयोजनाची भूमिका विशद केली. गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी जळगाव तालुक्यातील केंद्रनिहाय ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा आढावा घेतला. शाळाबाह्य मुले सर्वेक्षण व प्रवेश आणि नियमित प्रवेश याबाबत डायट अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांनी माहिती दिली.

कोविड काळातील शैक्षणिक परिपत्रकाचा आढावा प्रा. प्रदीप पाटील यांनी घेतला. डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन, अंगणवाडीमधील बालशिक्षण, ऑनलाईन शिक्षण परिषद, गंदगी हटाव भारत अभियान, तंत्रस्नेही प्रशिक्षणाची गरज, कोविड काळातील माझ्या शाळेतील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषयतज्ञ व शिक्षकांशी संवाद साधला. तसेच दि. 21 ते 29 ऑगस्ट 2020 दरम्यान जिल्हाभरातील संपूर्ण तालुक्यातील केंद्रामध्ये ऑनलाईन शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डायट प्राचार्य डॉ. मंजूषा क्षीरसागर यांनी सांगितले. केंद्रप्रमुख जितेंद्र चिंचोले, खलील शेख, डि.एन. ठाकूर व अनिता परमार यांनी आपली मते मांडली. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप पाटील यांनी तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांनी मानले.

Protected Content