रोटरी क्लब खामगांवद्वारे “मानसिक आरोग्य जागरूकता” कार्यक्रमाचे आयोजन

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मानसिक आरोग्य म्हणजे आपले भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण होय. आपण कसे विचार करतो, अनुभवतो आणि कसे वागतो यावर त्याचा परिणाम होतो. आपण तणाव कसा हाताळतो, गोष्टींची निवड करतो आणि इतरांशी कसे संबंध ठेवतो यावर देखील परिणाम होतो. चांगले मानसिक आरोग्य राखणं हे सर्वांच्याच आरोग्यासाठी आवश्यक असते.या बाबी लक्षात ठेऊन याबद्दल काही सोप्या टिप्स देण्यासाठी रोटरी क्लब खामगांवद्वारे शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ रोजी रात्री ९ वाजता स्थानिक मोहता महिला महाविद्यालय येथे “मानसिक आरोग्य जागरूकता” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब खामगांव आपल्या सदस्यांचे व्यक्तिमत्व विकास व्हावे यासाठी सतत कार्यरत असते आणि त्या अंतर्गतच या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.

सदर कार्यक्रमासाठी खामगांवच्या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ कोमल गोएनका यांच्या सेवा प्राप्त झाल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. रोटरी क्लब प्रभारी अध्यक्ष विजय पटेल व मानद सचिव आनंद शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ कोमल गोएनका यांनी पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे आणि अनेक व्यावहारीक उदाहरणे देऊन मानसिक स्वास्थ्याविषयी महत्वपूर्ण मुद्दे समजावून सांगितले. मानसिक आरोग्य म्हणजे मनाची नैसर्गिकरीत्या झालेली निकोप, व सुद्रुढ वाढ आणि विकास होय. मानसिक स्वस्थता, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या क्षमतेचा अनुभव येतो, ती व्यक्ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळून, समाजाला योगदान देऊ शकते. आपण शारीरिक स्वास्थ्याएव्हढेच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष पुरविले तर अनेक शारीरिक समस्यांवरदेखील मात करता येईल याचे महत्व त्यांनी उपस्थितांच्या मनावर बिंबविले.

डॉ. कोमल गोएनका यांना मदतनीस म्हणून रो डॉ गौरव गोएनका व रो विशाल गांधी यांनी मोलाची भूमिका निभावली. यावेळेस क्लबतर्फे डॉ कोमल गोएनका यांना स्मृतीचिन्ह सौ सरिता मंत्री यांनी प्रदान केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना पाहुणचार देण्यात आला. कार्यक्रमाचे अतिशय रोचक असे आभारप्रदर्शन रो देवेंद्र भट्टड यांनी केले. यावेळेस सुमारे ४५ रोटरी सदस्यांची उपस्थिती सदर कार्यक्रमाला लाभली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Protected Content