नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशाच्या सेवेत गुंतलेली संघटना आहे. संघाचे लोक नि:स्वार्थपणे काम करत असतात. राष्ट्रसेवेत गुंतलेल्या अशा संघटनेवर टीका करणं हे संविधानाच्या विरोधात आहे, असं वक्तव्य राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज केलं. त्यांच्या या विधानामुळे सभागृहात गदारोळ झाला व विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
एनटीए अध्यक्षांच्या नियुक्तीवर बोलताना समाजवादी पक्षाचे खासदार रामजी सुमन यांनी केलेल्या टिप्पणीमुळे अध्यक्ष जगदीप धनखड संतापले होते. धनखड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याच्या खासदाराच्या विधानावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे वक्तव्य संसदेच्या रेकॉर्डवर येऊ देणार नाही, असं ते म्हणाले. ‘आरएसएसची विश्वासार्हता वादातीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकाकी पाडण्याचं षडयंत्र कुणालाही करू देणार नाही, असं ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी जगदीप धनखड यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. जोपर्यंत एखादा सदस्य संसदीय कामकाजाच्या नियमांचे उल्लंघन करत नाही, तोपर्यंत सभापती कोणत्याही सदस्याच्या वक्तव्याला आक्षेप घेऊ शकत नाहीत, असं खर्गे म्हणाले.
संसदेच्या सदस्याने नियमांचे उल्लंघन केलं तरच सभापती हस्तक्षेप करू शकतात, हे मला मान्य आहे, परंतु इथे खासदार थेट भारतीय संविधानाच्या विरोधात बोलत आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे संविधानाचे उल्लंघन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना राष्ट्रीय कल्याणासाठी काम करत आहे. संस्कृतीसाठी योगदान देत आहे, ही आनंदाची बाब आहे आणि असं काम करणाऱ्या कोणत्याही संघटनेचा प्रत्येकानं अभिमान बाळगला पाहिजे, असे धनखड म्हणाले. धनखड यांच्या या वक्तव्यानंतर बहुजन समाज पक्ष व बिजू जनता दलासह सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.